मराठी सिनेसृष्टीतील ‘ती’ पिढी
कोल्हापूरमधील मध्यवर्ती भागात, पाच बंगला परिसरातील ‘जदुबन’ हा वाडा सतत माणसांनी गजबजलेला. असंख्य आठवणी आणि अनेक माणसं या वाड्याशी जोडली गेलेली! याच वाड्यात मी लहानाची मोठी झाले. माझे आजोबा आप्पासाहेब जाधव एक अजब व्यक्तिमत्व! कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओमध्ये भालजी पेंढारकर यांच्याबरोबर त्यांनी अनेक वर्षे साउंड रेकॉर्डिस्ट म्हणून काम केले. शेरो शायरी, संगीत, नाटक, सिनेमा, साहित्य इतकेच नाही तर स्टॉक मार्केट, खेळ सगळ्याच विषयांवर ते कोणाशीही सहज गप्पा मारीत. त्यामुळे त्यांचा मित्रपरिवार किती मोठा होता याचा काही हिशोबच नाही! माझं भाग्य थोर म्हणूनच त्या पिढीतील अनेक नामवंत व्यक्तींच्या सहवासात माझं बालपण समृद्ध झाले.
आजोबांचे खूप जवळचे मित्र, पु.ल.देशपांडे, कधीही कोल्हापूरला आले की जदुबनला आल्याशिवाय परतायचे नाहीत. फार लहान असतांना आम्हा मुलांना यामधले अप्रूप कळायचे नाही. फक्त एव्हढंच समजायचं की ‘भाई आजोबा आले की आम्हाला शाळेला दांडी मारायला परवानगी मिळायची आणि दुसऱ्या दिवशी शाळेत “पु.ल.देशपांडे घरी आले होते’ एव्हढीच चिठ्ठी चालायची! दोन्ही आजोबांच्या गप्पा तासनतास रंगायच्या. इतर वेळी ‘मोठ्या माणसांच्या गप्पा लहान मुलांनी ऐकू नयेत’ म्हणून रागवणारे आई बाबा या गप्पांच्या वेळी मात्र आम्ही तेथे बसून ऐकतोय ना याची पूर्ण काळजी घेत. त्या गप्पा म्हणजे आठवणींचं भांडार असायचं! ग.दि.माडगूळकर, वसंत बापट, सुधीर फडके, मा.विनायक अशा किती लोकांच्या गोष्टी ते सांगायचे.
पुढे ‘एक झुंज वाऱ्याशी’ हे पुस्तक पु.लं नी त्यांचा मित्र आप्पा याला अर्पण केलं तेव्हा जदूबनच्या गच्चीवर आजोबांना शाल, श्रीफळ आणि पुस्तक देऊन पु.लं नी त्यांच्या मैत्रीची दाद दिली. आम्ही कुटुंबीयांनी तो मैत्रीचा सॊहळा खूप जवळून अनुभवला.
चंद्रकांत, सूर्यकांत हे मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत तारे. दोघेही आजोबांचे मित्र. सूर्यकांत मांडरे पुण्यात राहत होते पण चंद्रकांत मांडरे कोल्हापूर मध्ये स्थायिक झाले होते. जदूबन पासून जवळच राजारामपुरी मध्ये ‘चंद्रकांत मांडरे कलादालन’ आजही आहे. चंद्रकांत मांडरे अतिशय उत्कृष्ट चित्रकार होते. या कलादालनात त्यांनी काढलेली चित्रे… पोर्ट्रेटस, तैलचित्र प्रदर्शनास मांडली आहेत. ते स्वतः याच वास्तूत वरच्या माडीवर राहत. तैलचित्र, पेन्सिल शेडींग या खूप लोकांना अवगत असणाऱ्या कला आहेत पण पावडर शेडींग फार दुर्मिळ आहे. त्याच्या प्रसारासाठी प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत ते मुलांसाठी मोफत कार्यशाळा चालवत. एका उन्हाळयाच्या सुट्टीत माझा पाय दुखावला होता आणि दीड एक महिना प्लास्टर मध्ये होता. मी त्यावेळी भरपूर चित्र काढायचे. माझा हा छंद बघून आजोबा मला चंद्रकांत मांडरेंना भेटायला घेऊन गेले. दुखावलेल्या पायाने कशीबशी कुबड्या घेऊन मी आजोबांसोबत दुसऱ्या माडीवर त्यांना भेटायला गेले. ते बघताच आधी ते आम्हा दोघांनाही “मोडक्या पायानी इतक्या पायऱ्या चढायची काय गरज होती?” म्हणून रागावले! त्यानंतर त्यांनी माझी चित्रकलेची वही बघितली. ती पाहून ते म्हणाले, ’रोज सकाळी १० ते १२ माझ्याकडे मुलं शिकायला येतात. तुम्ही दुपारी दोन वाजता या.’’ (लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आदरार्थी संबोधणे हे कोल्हापूरचे वैशिष्ट्य) आजोबांच्या आणि मांडरेंच्या गप्पा पुढे बराच वेळ चालल्या आणि मी विचार करत बसले की मला इतर मुलांबरोबर का नाही शिकवणार? मला उशिरा यायला का सांगितले असेल?
दुसऱ्या दिवशी दोन वाजता मी तेथे गेले. पायऱ्या शेजारी उजव्या बाजूला एक छोटी खोली होती. त्या खोलीच्या दारात खुर्ची टाकून स्वतः चंद्रकांत मांडरे इथे बसले होते. मला म्हटले,”तुम्हाला पायऱ्या चढल्या लागू नयेत म्हणून हि खोली रिकामी करून घेतली. आपण इथेच बसू.” मी ढसाढसा रडायचीच बाकी होते. दुखावलेल्या पायानी माझ्यासारख्या १७-१८ वर्ष्याच्या मुलीला पायऱ्या चढून वरती यावे लागू नये म्हणून हि ८० वर्षांची वल्ली स्वतः पायऱ्या उतरून (आणि वामकुक्षीच्या वेळ बदलून) खाली आली होती! मला खूप संकोचल्यासारखे झाले आणि त्यांनी असे करू नये यासाठी पुन्हा एकदा आजोबांची शिफारस घ्यावी लागली. चार दिवसांनी शिफारस मान्य झाली आणि मी इतर मुलांबरोबर सकाळी जाऊन पावडर शेडींग शिकू लागले. मराठीचा त्यांना किती अभिमान असावा हे पहिल्याच दिवशी दिसून आले! चित्राच्या ग्राफसाठी कागदावर आकडे घालायला त्यांनी सांगितले. मी सवयीनुसार इंग्रजी मधून आकडे घातले. त्यावर ते इतके नाराज झाले की त्यानंतर आजतागायत चित्र काढताना मी मराठीच आकडे लिहिते! पावडर शेडिंग साठी कागद गुंडाळून “स्टंप” बनवला जातो. त्यांनी सगळ्यांना तो बनवायला शिकवला परंतु स्वतः बनवलेला स्टंप त्यांनी मला वापरायला दिला. अजूनही तो मी जपून ठेवला आहे.
भालजी पेंढारकर … बाबा… म्हणजे आजोबांचे दैवत! माझा दहावीचा निकाल लागल्यानंतर बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आजोबा मला जयप्रभा स्टुडिओ मध्ये घेऊन गेले. स्टुडिओच्या आवारात एका छोट्याश्या घरात भालजी राहायचे. अतिशय साधी राहणी पण स्टुडिओच्या आवारात शिरताच दबदबा जाणवावा. त्या छोट्याश्या घरात एका खाटेवर बाबा बसले होते. खोलीमध्ये असंख्य पुस्तके आणि शिवाजी महाराजांचा एक पुतळा होता. भालजी हे शिवभक्त होते हे सगळ्यांना माहित आहेच. आजोबांनी स्टुडिओमध्ये सगळ्यांना पेढे वाटले. मला बाबांचा आशीर्वाद घेण्यास सांगितले. बाबा एव्हडेच बोलले, ”माझा नाही शिवरायांचा आशीर्वाद घ्या!” मी शिवरायांच्या पुतळ्याला नमस्कार केल्यानंतरच त्यांनी मला त्याच्या पाया पडू दिल्या! आशीर्वाद म्हणून माझ्या हातावर त्यांनी एक रुपयाचे नाणे ठेवले. माझ्या आजोबांना हि सवय कुठून लागली याचे उत्तर मला तिथे सापडले! शिवरायांचे भक्त बाबा आणि बाबांचे भक्त आजोबा… निस्सीम भक्ती काय असते ती मला तिथे त्या छोट्याशा खोलीत अनुभवायला मिळाली! तेथेच एका बाजूला सुलोचना (दीदी) आणि त्यांची मुलगी कांचन (घाणेकर) बसल्या होत्या. त्यांचेही आशीर्वाद घेऊन, थोडा वेळ गप्पा मारून आम्ही तेथून निघालो.
सुलोचना माझ्या आजोबांच्या बहिणी सारख्या होत्या. अनेकवेळा जदूबनच्या हॉलमध्ये कांचन घाणेकर, सुलोचना आणि आजोबांच्या गप्पा चालत. आम्हा मुलींना मात्र कांचन घाणेकर यांच्या लांबसडक वेणीचंच खूप अप्रूप वाटायचं! पुढे काही वर्षांनी आजोबांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त मी त्यांच्यावर एक डॉक्यूमेंटरी फिल्म बनवली. त्यावेळी सुलोचनादीदींशी बोलून त्यांच्या मुलाखतीची वेळ घेतली. ठरल्या वेळेला मी मुंबईला त्यांच्या घरी गेले. मुलाखतीनंतर त्यांनी माझ्या हातात एक सलवार कमीजचे कापड ठेवले आणि म्हणाल्या,”दिवाळी तोंडावर आली आहे. मी माझ्या घरच्या सगळ्या मुलींसाठी कापड घेते. तू ही माझ्या घरची मुलगी आहेस. हे घे नाहीतर मला वाईट वाटेल. कांचनच्या पसंतीचं कापड आहे, बघ आवडतं का?” आवड न आवडण्याचा प्रश्नच नव्हता. मी भारावून नुसतीच उभी राहिले. तेव्हड्यात “आणखी कोणाकोणाच्या मुलाखती घेणार?” असे त्यांनी विचारले आणि मी उत्तर देणार त्या आधीच एक कागद माझ्या हातात दिला. त्यावर रमेश देव, लता मंगेशकर, प्रभाकर पेंढारकर,अनंत माने, जयश्री टी. अश्या लॊकांचे पत्ते आणि फोन नंबर होते. “या सगळ्यांना फोन कर. त्यांनाही आपासाहेबांबद्दल बोलायला आवडेल.” अशी सूचना केली. अश्या सगळ्या दिग्गजांना फोन करून त्यांची वेळ घेणे, त्यांची मुलाखत घेणे हा विचार करूनच मला दडपण आले पण एकेक फोननंतर ते दडपण नाहीसे झाले. सगळ्यांनी खूप आपुलकीने मला घरी बोलावले आणि त्यांच्या जुन्या मित्राबद्दल भरभरून बोलले. लता मंगेशकरांची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांची मुलाखत घेता आली नाही पण त्यांच्या ‘फुले वेचिता’ आत्मचरित्रामधून ‘आप्पासाहेब जाधव’ यांचा संदर्भ डॉक्यूमेंटरीमध्ये वापरण्याची परवानगी दिली.
रमेश देव यांच्या जुहूच्या घरी त्यांनी मला बोलावले आणि आप्पाची नात म्हणून भरपूर खातिरदारी केली. मुलाखतीनंतर एक दीड तास माझ्याशी मनसोक्त गप्पा मारल्या. कोल्हापूरच्या आठवणी आणि शुटिंगमधले भरपूर किस्से त्यांनी सांगितले आणि निघताना म्हणाले, ”आता अश्या जुन्या आठवणी ऐकणारं कोणी नाही. खूप बरं वाटलं तुझ्याशी बोलून.” प्रभाकर पेंढारकर, राम गबाले यांनीही मुलाखतीसाठी भरपूर वेळ दिला. राम गबाले हे विख्यात दिग्दर्शक! त्याच्यासमोर कॅमेरा मागे उभी राहून मी दिग्दर्शन करायचं या विचाराने मी गांगरून गेले होते. पण त्यांनी निक्षून सांगितले, ”तुम्ही या फिल्म च्या दिग्दर्शिका आहात. तुम्ही सांगाल तसे तंतोतंत मी करणार. सांगा, कुठे बसू? कुठे बघू? किती वेळ बोलू?” जवळजवळ एक तासभर त्यांची मुलाखत भरपूर रंगली. बाबासाहेब पुरंदरे ही त्यांच्या मित्राबद्दल भरभरून बोलले. आजोबांकडून ऐकलेला एक किस्सा मी त्यांना सांगितला. जाणता राजाच्या शो साठी ते जेव्हा जेंव्हा कोल्हापूरला येत तेव्हा तेव्हा न चुकता रोज सकाळी जदुबनवर आजोबांना भेटायला येत… ते ही घोड्यावरून! त्यावर त्यांनीही जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि असे भरपूर किस्से सांगितले. साक्षात शिवशाहिरांकडून आजोबांची एवढी स्तुती मला प्रत्यक्ष ऐकायला मिळाली! दिनकर द. पाटील हे माझ्या आजींचे भाऊ आणि त्याहूनही जास्त आजोबांचे मित्र! अनेकवेळा या दोघांचा पत्रव्यवहार चालत असे. ‘दिनकर आजोबांचे हस्ताक्षर’ हा आजही आमच्याकडे स्पेशल विषय आहे.. पहिल्या दोन ओळीतच आजोबा खूप वैतागायचे आणि मग पुढचे पत्र वाचायची जबाबदारी माझ्याकडे यायची. अक्षर लागे-लागेपर्यंत किमान तासभर तरी जायचा! सुलोचना, सीमा देव यांच्याबद्दल लिहितांना ‘आमची नायिका’ आणि चंद्रकांत-सूर्यकांत बद्दल ‘आमचे नायक’ असे संबोधन ऐकून (आणि वाचून) खूप मजा वाटायची. प्रत्येकवेळी पत्र वाचनानंतर आजोबा आवर्जून सांगायचे, ”शुद्ध हस्ताक्षर काढण्याचा सराव ठेव. हे असे अक्षर मुळीच असू नये.” आणि कधी दिनकर आजोबांचा फोन आला किंवा ते घरी आले कि पहिली किमान १० मिनिटे तरी गलिच्छ अक्षरावरून त्यांची हजामपट्टी व्हायची. पण म्हणून कधी हा पत्रव्यवहार कमी झाला नाही! आजोबांच्या पंच्याहत्तरीच्या काही महिनेच आधी मंगेश पाडगावकर आणि अरुण दाते यांच्याशी आजोबांची ओळख झाली होती. त्या दोघांनी आजोबांना वचन दिले होते की त्यांच्या पंच्याहत्तरीला आम्ही जदुबनच्या गच्चीवर गाणं म्हणणार आणि कविता वाचन करणार. आणि खरोखरच दोघेही ६ ऑक्टोबरला कोल्हापूरमध्ये दाखल झाले! मंगेश पाडगावकर आम्हा मुलांना भरपूर विनोदी कविता ऐकवायचे तर अरुण दाते त्यांच्या लहानपणीचे अनेक मजेदार किस्से आम्हाला ऐकवायचे.
खरंच, ती पिढी काही औरच होती. आजच्यासारखं मित्रांशी सहज भेट होणं, व्हाट्स अँप वरून ‘कॉन्टॅक्ट’ मध्ये रहाणं वगैरे प्रकार तेव्हा नव्हतेच. पण मैत्री मात्र निखळ आणि घट्ट होती. महिनोंमहिने बोलणंही व्हायचं नाही पण जेव्हा बोलायचे तेव्हा मनापासून, भरभरून बोलायचे! मैत्री पुढे प्रसिध्दि, नाव, वय सगळंच शून्य! मी खूप खूप नशीबवान कि अशी मैत्री मला खूप जवळून अनुभवता आली! डॉक्यूमेंटरी फिल्म YouTube वर ‘जदुबनचा किल्लेदार’ या नावाने उपलब्ध आहे.
गायत्री जाधव